पुणे जिल्हा | सातारा-पाबळ राज्यमार्गाची दुरवस्था

सोरतापवाडी, (वार्ताहर) – कोरेगाव मूळ येथून जाणारा सातारा ते पाबळ या राज्य मार्ग क्रमांक 117 या रस्ताची अवस्था अतिशय वाईट झाली असून, तळेगाव ढमढेरे ते बेलसर फाट्यापर्यंत 146 कोटींचा रस्ता कधी पूर्ण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तळेगाव ढमढेरे ते बेलसर फाट्यापर्यंत अंदाजे 42 किलोमीटरचा हा रस्ता युती शासनाच्या काळात मंजूर करण्यात आला होता. कोरेगाव मूळ, भवरापूर, अष्टापूर, प्रयागधाम, उरुळी कांचन, शिंदवणे या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून जात असून या रस्त्याला पुणे-सोलापूर लोहमार्गावर रेल्वे गेट क्र. 8 वर उड्डाणपूल मंजूर झाला होता; मात्र काही कारणास्तव या पुलाचे काम रखडले. कोरेगाव मूळ व परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून जावे लागत आहे.
प्रयागधाम चॅरिटेबल हॉस्पिटलला जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने हाँस्पिटलला येणार्या रुग्णांना खराब रस्त्यामुळे खूपच त्रास होत आहे.
सोलापूर महामार्गावरुन कोरेगावमूळ कडे जाताना अनेक खड्डे चुकवत जावे लागत आहे. ठिक ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी खडी टाकली असल्यामुळे अनेक दुचाकी चालक त्या खडी वरुन घसरुन पडले आहेत.
चार वर्षांपासून या रस्त्याचे काम चालू असून साइडपट्ट्या भरलेल्या नसल्याने रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे तयार झाले असुन अनेक वाहने त्यात गेल्याने किरकोळ अपघात झाले आहेत. वर्षभरापासून ठेकेदाराचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे.
कोरेगाव मूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांनी सतत या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे 146 कोटी रुपयांच्या या रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रासच होत असल्याचे दिसून येत आहे.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे
फेब्रुवारी 2020मध्ये आमदार अशोक पवार यांनी या रस्ताची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे थोडे दिवस काम चालू होते. पण आता तिथे नवीन रस्त्यावर खड्डे पडले असुन त्या खड्डयांकडे बघून नागरिक म्हणतात की या रस्त्याचा दर्जा किती चांगला आहे हे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही.





