चिपळूणमध्ये महापुराचा धोका; कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती तात्पुरती बंद

विजय लाड / कोयनानगर : मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात अनेक भागांत पाणी शिरले आहे. त्यातच कोयना जलविद्युत प्रकल्पातून चिपळूण खाडीला मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरातील महापुराचा धोका अधिक गडद झाला आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी महानिर्मिती कंपनीला कोयना जलविद्युत प्रकल्प तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार सध्या प्रकल्पाची युनिट्स बंद करण्यात आली असून, अतिरिक्त पाणी खाडीत जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्प काही काळ सुरू करून पुन्हा बंद केला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आणि पाण्याची पातळी स्थिर झाल्यावरच वीज निर्मिती पुन्हा सुरू केली जाईल.”
दरम्यान, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूण शहर आणि परिसरातील पाणीपातळीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार तातडीची उपाययोजना करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.





