कामशेत-जांभवली रस्त्यावर खड्डेच खड्डे

नाणे मावळ : कामशेत ते जांभवली या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी तर ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता’ तेही समजत नाही. अशा रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोबत वाहनांचे नुकसान होत आहे. नागरिकांचे हाल थांबविण्यासाठी लवकरात लवकर खड्डे भरण्याचे काम हाती घ्यावे, अशी विनंती प्रशासनाला नागरिक करीत आहे.
कामशेत – जांभवली मुख्य रस्त्यासह उपरस्त्यांचीही काही ठिकाणी चाळण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. परंतु ते काम केवळ दिखावा होते आणि निकृष्ट दर्जाचे होते, हे आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसून आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा भाग पर्यटकांना आकर्षित करीत आहे, परंतु रस्त्याच्या दूरवस्थेमुळे पर्यटक हैराण होत आहेत.
स्थानिकांसह पर्यटकांचे हाल…
साधारण मे महिन्याच्या मध्यापासूनच मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून खड्डा चुकविताना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांसाठी तर रस्त्यातील खड्डा चुकवून चालणे हे आव्हानच असते. दररोज कामानिमित्त या मार्गावरून जाणारा नोकरदार वर्ग, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक सर्वांनाच खड्डेयुक्त रस्त्यामुळे त्रास होत आहे.




