Pimpri : नाणे मावळात नैसर्गिक सौंदर्याची उधळण; फुलांनी बहरला परिसर

नाणे मावळ : परिसरात सध्या निसर्गाने आपली सोनसळी चादर पसरवली आहे. डोंगरकपारी, पठार आणि रस्त्यालगतच्या माळरानांवर पिवळ्या फुलांची बहार पाहून मनालाही निसर्गसौंदर्याचा आनंद मिळत आहे. हिरव्यागार गवतावर पिवळ्या फुलांचा पिसारा उमटल्याने जणू निसर्गने सोनेरी पैठणीला हिरवी किनार जोडली आहे, असा मोहक देखावा निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कडेला उभे राहून दूरवर नजर टाकली की, सोन्याच्या झळाळीने उजळलेले माळरान आणि डोंगरकपारी अद्भुत निसर्गचित्रासारखे भासतात. वाऱ्याच्या झुळुकीने डोलणारी ही पिवळी फुले जणू रुपवती स्त्रीच्या साडीचे सौंदर्यच डोळ्यांसमोर उभे करतात. काही क्षणांतच ही दृश्ये समुद्राच्या लाटांप्रमाणे तरंगताना दिसतात.
या परिसरात कवळा या लहानशा वनस्पतीची ही पिवळी फुले विखुरलेली असून, त्याचबरोबर अनेक रंगीबेरंगी फुलांची उधळण झाली आहे. रानभाज्या आणि औषधी वनस्पतीही या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. या फुलांच्या सान्निध्यात विविध रंगांची फुलपाखरे दिसतात, ज्यामुळे नाणे मावळातील निसर्ग अधिकच जिवंत आणि नयनरम्य वाटतो.
पहाटे या फुलांवर पडलेले दवबिंदू जणू चकचकीत हिरे माळल्यासारखे भासतात. पावसाळ्यात पावसाच्या थेंबांमुळे हा निसर्ग अधिक खुलतो. जणू आई आपल्या लेकराला प्रेमाने स्नान घालत आहे, असा निसर्गाचा वात्सल्यपूर्ण स्पर्श अनुभवायला मिळतो.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत येथील सोनेरी सौंदर्य आपल्या उत्कर्षबिंदूवर असते. सूर्यास्ताच्या वेळी डोंगरांच्या कुशीत पडणारा सोनेरी प्रकाश मनाला समाधान देतो, तर वाऱ्याची मंद झुळूक अंगावर शहारे आणते. शासनाने या भागाकडे पर्यटनदृष्ट्या लक्ष दिल्यास हा प्रदेश एक अद्वितीय निसर्ग पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होऊ शकतो.





