पर्यटकांना खुणावतंय नाणे मावळ !

कामशेत : सह्याद्री डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या मावळ तालुक्यात निसर्गाचा अविष्कार असलेली अनेक ठिकाणे आहेत. ही सर्वच ठिकाणे पर्यटकांना भूरळ घालतात. सोबत अनेक धरणे, गडकिल्ले, लेणी, धबधबे यांमुळे मावळ हा पर्यटनाचा तालुका म्हणून परिचित आहे. मावळातील पर्यटनाकडे पाहता पूर्वी केवळ लोणावळा-खंडाळा, कार्ला भाग आणि पवना धरण परिसर हेच चर्चेत असायचे. परंतु अलीकडच्या काळात नाणे मावळ, आंदर मावळ भागही पर्यटकांना आकर्षित करीत आहे. येथील उंचच्या उंच डोंगर, स्वच्छ सुरक्षित धबधबे, शेतीसह हिरवागार परिसर हा पर्यटकांना खुणावत आहे.
मावळातील नाणे मावळ हा ग्रामीण बहुल भाग आहे. डोंगर टेकड्यांचा हा परिसर खऱ्या खुऱ्या निसर्ग सौंदर्याची अनुभूती घडवितो. डोंगराळ भाग असल्यामुळे नाणे मावळात अनेक धबधबे आहेत. काही धबधबे वगळता हे धबधबे कौटुंबिक पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. सोबत येथील प्राचीन मंदिरे ही देखील पर्यटकांना मोहित करत आहेत. भक्ती आणि पर्यटन याचा संगम साधण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने पर्यटक नाणे मावळकडे वळत आहेत.
नाणे मावळात कसे पोहोचाल?
कामशेत हे नाणे मावळाचे द्वार समजण्यास हरकत नाही, त्यामुळे सर्वप्रथम कामशेत येथे पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणांहून पोहोचावे. तिथून नाणे मावळकडे जाणारा रस्ता आहे. रेल्वे फाटक ओलांडून नाणे मावळ भागात जाणाऱ्या एकमेव मार्गाने प्रवास करत ठिकाणे पाहता येतात.
खासगी वाहने हा उत्तम पर्याय
नाणे मावळातील हा भाग ग्रामीण असल्याने येथे जास्त प्रमाणात वाहतुकीची सोय नाहीये, सध्या येथील रस्त्यांची कामे होत आहेत, परंतु प्रवासी संख्या अधिक नसल्याने वाहतुकीची सोय तितकीशी नाही. अशावेळी येथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे खासगी वाहन घेऊन येणे हा उत्तम पर्याय आहे.
ढाक भैरी किल्ल्याकडे जाण्यास प्रतिबंध
पावसाळा असल्याने आणि अतिदुर्गम भागात असल्याने प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाणे मावळातील मावळ-कर्जत तालुक्याच्या सीमेवर असलेला ढाक भैरी किल्ला पर्यटक, ट्रेकर्स यांच्यासाठी प्रतिबंधीत केला आहे. यासह पोलीस प्रशासन, गावातील स्वयंसेवक नागरिकांना याबाबत आवाहन करीत आहेत.
भक्ती अन् पर्यटनाचा संगम श्रीक्षेत्र कोंडेश्वर
निसर्गाचं वरदान असलेल्या मावळ तालुक्याला ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. या दुहेरी संगमामुळे मावळ तालुक्यात जसे पर्यटक येतात, तसेच विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांच्या भेटीसाठी भाविकभक्तही येतात. मावळमधील नाणे मावळ भागातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर हे असे ठिकाण आहे जिथे आपल्याला निसर्ग आणि तीर्थ या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. ऐतिहासिक श्रीक्षेत्र कोंडेश्वर मंदिर आणि त्या भोवतीचा अद्भूत निसर्ग पाहणे म्हणजे स्वर्गीय सुखच. याच सुखाची अनुभूती घेण्यासाठी सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नाणे मावळ भागात येत आहेत.
श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथे येणाऱ्या नागरिकांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. कोंडेश्वरकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, पार्किंगची सुविधा, निवारा शेड, स्वच्छतागृहे नव्याने निर्माण करण्यात आली आहे. तर येथे येणाऱ्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस पाटील, स्वयंसेवक कायमस्वरूपी उपलब्ध असतात.
– गणपत ठोसर, अध्यक्ष, श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्ट
कोंडेश्वर मंदिराच्या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर येथे पोलीस प्रशासनाकडून कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.
– संगिता पवार, पोलीस पाटील
पावसाळ्याचे दिवस असल्याने शनिवार-रविवार वीकेंडसह इतर दिवशीही पर्यटक मोठ्या संख्येने नाणे मावळ भागात येत आहेत. कोंडेश्वर मंदिर, पाल लेणी, ढाकभैरी किल्ला परिसर आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होत असून हॉटेल व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.
– अमोल पवार, हॉटेल व्यावसायिक





