Pimpri : कांब्रे-कोडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिंकी राऊत बिनविरोध

नाणे मावळ : नाणे मावळ विभागातील सरपंचपदी पिंकी हेमंत राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच सीमा गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी २१ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची निवड झाली.
शेतकरी कुटुंबातील पिंकी राऊत यांची निवड एकमताने झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण होते. निवडणूक अधिकारी स्वाती शिंदे, तलाठी योगिता कदम आणि ग्रामसेवक भाऊसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. बिनविरोध निवड घोषित होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.
नवीन सरपंच पिंकी राऊत यांनी निवडीनंतर बोलताना “गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीन.” असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
या वेळी ग्रामसेवक भाऊसाहेब चव्हाण, माजी सरपंच स्वामी गायकवाड, सुवर्णा गायकवाड, कविता बाबाजी गायकवाड, किरण लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब पहाड, उपसरपंच मारुती गायकवाड, तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीमुळे गावात एकता, सौहार्द व सहकार्याचे उदाहरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाकडून गावकऱ्यांना विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.





