Pimpri : खराब रस्त्यामुळे वाढला अपघाताचा धोका

नाणे मावळ : कोंडीवडे परिसरातील कांब्रे ते कोंडीवडे या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, खचलेली व पाण्याने भरलेल्या ठिकाणांमुळे सदर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनली असून, अपघाताच्या घटनाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. शालेय वाहनांसह खाजगी वाहनांचा वापर याच मार्गावरून मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता, वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा खड्डे चुकवताना वाहनांचे अपघातही होत असतात.
विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता सतत निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चारा घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही हा रस्ता अडथळ्याचा बनला आहे. शेतमाल वाहून नेताना वाहनांमध्ये नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे व रस्त्याच्या डागडुजीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांतून सातत्याने केली जात आहे





