नगर | सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी पोस्टमन करणार सर्वेक्षण

नगर, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोचविण्यासाठी पोस्ट खात्याची निवड झाली आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी पीएम सूर्यघर नावाचे ॲप तयार केले आहे. लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. देशभरात एक कोटी घरांमध्ये ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. घराच्या छतावर सौर उर्जा वीजनिर्मिती संच बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे.
ही वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, असे या योजनेचे स्वरूप आहे. घराला लागणाऱ्या गरजेएवढी वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते. अतिरिक्त वीज महावितरणला विकत घेणार आहे. कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंत प्रत्येक किलोवॅटला ३० हजारांचे तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविणाऱ्या कुटुंबाला एका किलोवॅटला १८ हजारांचे असे जास्तीत जास्त ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.
ग्राहक सध्या वापरत असलेल्या वीज वितरकाची माहिती, मागील सहा महिन्यांतील कोणत्याही एका वीजबिलाचा फोटो अपलोड केला जाईल. घराच्या छतावर किती क्षमतेचा सौरउर्जा संच बसविता येऊ शकतो, याची नोंदणी केली जाईल. कुटुंब, संस्था या योजनेस पात्र ठरणार आहेत.
एक किलोवॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर क्षेत्र
सौरउर्जा संच हा सुमारे २५ वर्षे चालतो. भाड्याच्या घरात, रिकाम्या जागेवरही उभारता येऊ शकते. स्थलांतरित केले जाऊ शकते. एक किलोवॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या एका दिवसात चार ते पाच युनिट वीजनिर्मिती होऊ शकते.
पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. प्रत्येकाला मोबाईल दिलेले असून ऑनलाईन ॲपद्वारे सध्या नोंदणी सुरू आहे. नागरिकांनी याबाबत त्यांना सहकार्य करावे. -संदीप हदगल, सहाय्यक डाक अधीक्षक, अहमदनगर





