Municipal Corporation Result | राज्यातील महापालिका निवडणुकीचा आज निकाल स्पष्ट होणार आहे. त्यानुसार आता पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजपने ३२ ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी १४ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय शिवसेना उबाठा 0, शिवसेना शिंदे 2 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. पुणे प्रभाग क्रमांक ७ मध्ये पोस्टल मतदान मध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार तर भाजपचा एक उमेदवार आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्येही पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे.या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. हेही वाचा: नाशिकमध्ये मनसेचे ‘इंजिन’ पुन्हा धावणार की भाजपाचे कमळ फुलणार?; थोड्यावेळात समजणार