Post Election Cash Flow : निवडणूक संपताच बाजारपेठेत रोख पैशांचा पूर; डिजिटल पेमेंट गायब, रोखीने खरेदीचा धुमधडाका
निवडणूक आचारसंहितेमुळे काही काळ मंदावलेले आर्थिक व्यवहार अचानक गती घेत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये डिजिटल व्यवहारांपेक्षा थेट रोखीने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र आहे.

Post Election Cash Flow – महापालिका निवडणुकीचा निकाल लागला असून अजूनही बाजारपेठेत रोख पैशांची चलती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विशेषत: इलेक्ट्राॅनिक्स व गृहोपयोगी उपकरणांच्या बाजारपेठेतील ही गर्दी निवडणूक मतदारांना सुखावणारी असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमध्ये रोख पैशांची मोठी चलती सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे काही काळ मंदावलेले आर्थिक व्यवहार अचानक गती घेत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये डिजिटल व्यवहारांपेक्षा थेट रोखीने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र आहे.गेल्या महिनाभरात प्रचार, सभा, पदयात्रा आणि आचारसंहितेमुळे अनेक व्यवहार पुढे ढकलण्यात आले होते. निकाल जाहीर होताच दुसर्याच दिवसापासून पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड, सांगवी आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक शोरूम, मोबाइल स्टोअर्स, फर्निचर तसेच गृहपयोगी साहित्याच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.व्यापार्यांच्या मते, निवडणूक काळात बाजारात न फिरलेली रोख रक्कम आता एकाच वेळी व्यवहारात येत आहे. निवडणूक संपल्यानंतर अचानक खरेदी वाढली आहे. विशेष म्हणजे पूर्वी चहा पिल्यानंतर अगदी दहा रूपये देखील ग्राहक डिजिटल पेमेंटने देत होता. आता मात्र डिजिटल पेमेंट टाळून रोखीने व्यवहार करत आहेत, असे आकुर्डीतील एका व्यापार्याने सांगितले.
पाचशे रुपयांच्या नोटांची भरमार
हॉटेल्स, कपड्यांची दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीत 500 रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचेही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक काळातील आर्थिक व्यवहारांबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. काही भागांमध्ये एका-एका कुटुंबाला हजारो रुपये मोजले गेले असल्याची चर्चा उघडपणे होत आहेत.
प्रमुख पक्षांच्या अनेक उमेदवारांनी मतदान मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे वाटप केल्यामुळे काही घरांमध्ये निवडणूक काळात लाखो रुपये जमा झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक संपताच हीच रक्कम बाजारात खर्चासाठी बाहेर पडत असल्याने रोख चलनाचा ओघ अचानक वाढल्याचे व्यापारी आणि अर्थवर्तुळातील जाणकार सांगतात.
उमेदवारांना खंत, मतदार-व्यापारी खुश
विशेष बाब म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप करूनही अनेक उमेदवारांना अपेक्षित मतदान मिळाले नसल्याची कबुली पराभूत उमेदवार खासगीत देत आहेत. पैसे वाटूनही मतदारांनी अपेक्षेप्रमाणे साथ दिली नाही, अशी खंत काही ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष निकाल यातील तफावत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
निवडणुकीचा ताण संपल्यानंतर नागरिकही मोकळेपणाने बाजारात उतरत असल्याचे चित्र आहे. कुटुंबासोबत खरेदीसाठी बाहेर पडणार्यांची संख्या वाढली असून, बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बाजारात फिरणारे चलन वेगाने हात बदलत असल्याने, आगामी काही दिवसांतही ही खरेदीची लाट कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्ग व्यक्त करीत आहे.





