पिंपरी (प्रतिनिधी) – ‘करोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील खासगी शाळांबरोबरच आता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात देखील ऑनलाइन शिक्षणाचेच होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. व्हॉट्सऍप, यू ट्यूब, शिक्षकांचे ब्लॉग्ज आदी सोशल मीडियासह रेडिओ कम्युनिटी, स्थानिक केबल चॅनेल आदी विविध पर्यायांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापर करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या 105 प्राथमिक तर, 18 माध्यमिक शाळा आहेत. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होतात. मात्र, यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचे अद्याप कोणतेही आदेश नाहीत. मात्र, 15 जूनच्या पुढे ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊ शकते. रेडझोन वगळता करोनाचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या इतर जिल्ह्यांमध्ये कमी विद्यार्थी संख्येचे गट करून शाळा सुरू करता येईल का, याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडून विचार सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये खासगी शाळांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून बैठका-चर्चा आदींच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत याबाबत दोन बैठका झाल्या आहेत. आजही महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची झूम ऍपद्वारे ऑनलाइन बैठक झाली. मुख्याध्यापकांच्या नवीन संकल्पना काय, ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर, त्यातील अडचणींवर कशी मात करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
ऑनलाइनचे नियोजन काय?
महापालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि शिक्षकांचा “तंत्रस्नेही’ हा व्हॉट्सअप ग्रुप सध्या सुरू आहे. तसेच, महापालिका शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम ऑनलाइन शिकविण्यासाठी इयत्तानिहाय कार्यक्रम तयार केला जात आहे. तंत्रस्नेही व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून त्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षकांनी तयार केलेल्या पालकनिहाय ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या लिंक, यूट्यूबवरील गोष्टी, गाणी यांच्या लिंक्स शेअर केल्या जाणार आहेत. त्याशिवाय, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्थानिक केबल नेटवर्कचा वापर करता येईल का, याबाबतही चाचपणी सुरू आहे. शिक्षकांच्या ब्लॉग्जचा देखील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. रेडिओ कम्युनिटी या पर्यायावर देखील सध्या विचार सुरू आहे. त्यामध्ये एफएम चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑडिओ ऐकवून देखील शिक्षण देता येणार आहे.
दोन सत्रांतील शाळांचाही पर्याय
करोना संसर्ग रोखण्यासाठी आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने कमी पटसंख्या ठेवून शाळा भरविण्यासाठी राज्य सरकारची संमती मिळाल्यास महापालिकेच्या एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रामध्ये भरविण्यात येणार आहे. तसेच, ज्या शाळा इमारतींमध्ये वर्गखोल्या उपलब्ध नाही तिथे वारनिहाय आणि इयत्तानिहाय दोन दिवसाआड सलग शाळा चालू ठेवण्याचा पर्यायही पुढे आला आहे.
महापालिकेच्या शाळा जून महिन्यात ऑनलाइन माध्यमाचा वापर करून कशा सुरू करता येईल, याबाबत सध्या आयुक्तांसोबत बैठका सुरू आहेत. व्हॉट्सअप, यू ट्युब, रेडिओ कम्युनिटी अशा विविध पर्यायांचा आम्ही त्यासाठी विचार करीत आहोत. राज्य सरकारने कमी पटसंख्येत शाळा भरविण्यासाठी परवानगी दिल्यास दोन सत्रामध्ये वारनिहाय व इयत्तानिहाय नियोजन करून शाळा भरविल्या जातील.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात ऑनलाइन शिक्षणाद्वारे कशी करता येईल, याबाबत सध्या नियोजन सुरू आहे. राज्य सरकार शाळांबाबत काय निर्णय घेते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त