Pune : मनपा शाळांना सीसीटीव्हीचे कवच

पुणे : शहरातील महापालिका शाळांच्या इमारती तसेच शाळांच्या परिसराच्या सुरक्षेसाठी शहरातील पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरात महापालिकेच्या सुमारे २८० हून अधिक शाळा असून त्या शहरातील सुमारे दीडशे इमारतींंमध्ये भरतात. तर काही शाळांना मोठी मैदाने आहेत. तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असले तरी त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी तसेच नशेखोरांचा वावर असणे, गुन्हेगारी कृत्य करणे अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांचे नुकसान टाळणे तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शाळांमधे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
त्याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. तर, आयुक्तांनी विद्युत विभागाने सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, विद्युत विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कळविले होते. त्यानंतर आता शाळांच्या सुरक्षेचे प्राधान्य लक्षात घेता महापालिकेने शहरात हायड्रो उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अंदाजपत्रकात १२ कोटींची तरतूद केली होती. हा प्रकल्प होणार नसल्याने या निधीतून तीन कोटींचा निधी शाळांना सीसीटीव्ही बसविण्यासाठी वर्गीकरणाद्वारे देण्यात आला आहे.





