Pimpri News : तालुक्यात महिलाराज येण्याची शक्यता

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
महिला वर्गात उत्साह, राजकीय हालचालींना वेग
वडगाव मावळ – तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची यादी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता भेगडे लॉन्स येथे जाहीर करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या एकूण दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे तालुक्यात महिलाराज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महिला वर्गात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सोडतीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या गेल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
राजकीय हालचालींना वेग
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षांचे नेतृत्त्व आणि तालुक्यातील प्रभारी आपल्या पक्षातील इच्छुकांच्या नावाची शिफारस करत आहेत. मागील काही दिवसांत मावळ तालुक्यातील बदललेले राजकीय समीकरण पाहता, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतांची चुरस होण्याची शक्यता आहे.
विशेषतः महिला जागांवर आरक्षण जाहीर झाल्यामुळे महिला उमेदवारांसाठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक महिलांनी राजकारणात सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मागासवर्गीय जागांवर इच्छुक उमेदवारही प्रचाराला सुरुवात करत आहेत. आरक्षणामुळे इच्छुकांच्या रणनीतीत बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. आरक्षित जागांवर पात्र उमेदवार निवडण्याची तयारी सुरू झाली आहे.
पंचायत समितीच्या जागांचे आरक्षण
टाकवे बु. – सर्वसाधारण स्त्री
नाणे मावळ – अनुसूचित जमाती स्त्री
वराळे – सर्वसाधारण
इंदोरी – सर्वसाधारण
खडकाळे – अनुसूचित जाती
कार्ला – सर्वसाधारण स्त्री
कुसगाव बु. – सर्वसाधारण
काले – सर्वसाधारण स्त्री
सोमाटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
चांदखेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जिल्हा परिषदेतील गटांचे आरक्षण
टाकवे बुद्रुक – अनुसूचित जमाती पुरुष
इंदोरी – सर्वसाधारण महिला
खडकाळे – सर्वसाधारण महिला
कुसगाव – सर्वसाधारण पुरुष
सोमाटणे – सर्वसाधारण महिला





