पुणे – डॉल्बी (डीजे) वाजविणाऱ्या मंडळांना आर्थिक सहाय्य देणार नाही, अशी घोषणा पुनीत बालन ग्रुपच्या अध्यक्षांनी केल्यानंतर त्याचे शहरातील अनेक गणेश मंडळे आणि नागरिकांनी सहर्ष स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मंडळे डॉल्बीच्या भिंती उभारून शहराच्या ध्वनिप्रदूषणात भर घालत होती. याशिवाय मिरवणुकीदरम्यान हिणकस गाण्यांचीही भरमार दिसून येत होती. यानिमित्ताने त्यात बदल होऊन पुन्हा पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यास तरुणांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा यानिमित्ताने करायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांत काही गणेश मंडळांकडून उत्सवाच्या पावित्र्याला गालबोट लागेल असे वर्तन होताना दिसत आहे. कुठे कुठे पूर्वी आढळणाऱ्या निस्सीम भक्तीची जागा आता एंजॉयमेंटने घेतल्याचे दिसते. त्यामुळे काही ठिकाणी तद्दन भपकेबाजी, मिरवणुकीत हिडीस गाण्यांवर आक्षेपार्ह हावभाव करत केलेला नाच, या सगळ्या गोष्टींनी उत्सवातील वातावरण गढूळ होत चालले होते. गतवर्षी पोलीस प्रशासनाने लेझर बीमबाबत असाच कठोर निर्णय शहरात राबविला. त्याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी आदेश झुगारल्याने गुन्हे दाखल झाले. अशा अनेक चुकीच्या पद्धतीने पडणाऱ्या प्रघातांबाबत कोणीतरी पुढे येऊन काहीतरी करावे, अशी अपेक्षा नागरिकही करत होते. कदाचित बालन ग्रुपचा हा निर्णय त्याची सुरुवात ठरू शकतो. मंडळांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या इतर प्रायोजकांनीही अशीच स्तुत्य पावले उचलली तर शहरातील गणेशोत्सवाला निश्चितच गतवैभव मिळू शकते. डॉल्बीच्या भिंती घातकच! फक्त गणेशोत्सवच नव्हे, तर इतरही अनेक उत्सवांनिमित्त शहरात भल्यामोठ्या डॉल्बीच्या भिंती उभारून परिसर दणाणून टाकला जातो. त्याच्या कर्णकर्कश्श आवाजाने आजपर्यंत अनेकांना ठार बहिरेपण आले काही. काही वृद्ध, लहान बालके, गर्भवती मातांना इजा पोहोचली आहे. हे माहीत असूनही अनेक मंडळे त्याकडे कानाडोळा करतात, हीच खरंतर आश्चर्याची बाब आहे. असे कृत्य करणाऱ्या मंडळांनी खरोखरच आत्मचिंतन करून स्वतःहून अशा गोष्टी टाळण्यासाठी पाऊल उचलावे, अशी अपेक्षा जाणकारांतून व्यक्त होत आहे.