Pooja Khedkar | बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले होते. या अपहरण प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनोरमा या वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर हिच्या आई आहेत. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात पोहोचले. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांवर कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलीप खेडकर सध्या फरार आहेत. नेमकं काय प्रकरण? शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास, मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH12RP5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. यानंतर चालक चंदकुमार चव्हाण यांनी ट्रक मालक विलास ढेंगरे यांना तात्काळ माहिती दिली. यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. अपहरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी कारचा मागोवा घेऊन MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चालकाला घरातून बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. दिलीप खेडकर फरार या प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सध्या दिलीप खेडकर हे फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा: “वयाच्या पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं वाटतंय”; नाना पाटेकरांचे निवृत्तीचे संकेत