पूजा खेडकरांना मोठा धक्का ! कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली : मागच्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यामुळे पूजा खेडकर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या. यानंतर त्यांच्यावर सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.





