Eknath Shinde : “हाथी चले बाजार.. बाकी पुढचं मी काय बोलत नाही..”; शिंदेंनी विरोधकांना सुनावलं; म्हणाले, अमित भाई बोलतील तेव्हा पळून जातील….
"अमितभाईंचा राजीनामा मागणे म्हणजे निव्वळ राजकारण आहे. 'हाथी चले बाजार…' पुढे काय आहे, ते सांगण्याची गरज नाही."

Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विरोधकांनी संसदेत आणि संसदेबाहेर सुरू केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे. विरोधकांकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शिंदे यांनी ती केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप केला.
“देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी कठोर कारवाई करणारे आणि कलम ३७० हटवण्यासारखे ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या अमित शाहांना देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. अमितभाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
संसद अधिवेशनादरम्यान विरोधकांनी अमित शाह यांच्यावर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल चढवला आहे. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईनंतर अमित शाह संसदेत आले नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली.
‘आमची युती वैचारिक; आम्ही सौदेबाजी करणारे नाही’
महायुतीतील समन्वय आणि आगामी राजकीय घडामोडींविषयी बोलताना शिंदे म्हणाले, “आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे आमची भाजपसोबतची युती ही सत्तेसाठी किंवा सौदेबाजीसाठी नाही, तर विचारांवर आधारित आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही ‘हे द्या, ते द्या’ अशी बार्गेनिंग करणारे लोक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे नेते आहेत. देशहित आणि एनडीएच्या हिताचा जो निर्णय योग्य असेल, तो घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे.”
हे देखील वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीसाठी; घडामोडींना वेग, काही वेळातच..
विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले, “विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात चर्चा करणे, सरकारला प्रश्न विचारणे आणि आंदोलन करणे हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे.
मात्र, जंतर-मंतरऐवजी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न हा राजकीय स्टंट होता. अशा प्रकारच्या आंदोलनातून केवळ वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला.”
अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “अमितभाईंचा राजीनामा मागणे म्हणजे निव्वळ राजकारण आहे. ‘हाथी चले बाजार…’ पुढे काय आहे, ते सांगण्याची गरज नाही.” असं देखील शिंदे यावेळी म्हणाले.






