Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
राहुल गांधी हे केवळ त्यांच्या ‘पीआर’ टीमने दिलेले मुद्दे पुन्हा पुन्हा मांडतात आणि त्यांचे कार्यक्रम हे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनसारखे असतात, असा थेट आरोप जोशी यांनी केला आहे.

Rahul Gandhi – भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत जोशी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या मोहिमेवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे केवळ त्यांच्या ‘पीआर’ टीमने दिलेले मुद्दे पुन्हा पुन्हा मांडतात आणि त्यांचे कार्यक्रम हे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनसारखे असतात, असा थेट आरोप जोशी यांनी केला आहे.
इंदूरमध्ये माध्यमांशी बोलताना जोशी यांनी ‘छात्रों की गूंज’ला ‘झूठ की गूंज’ असे संबोधले. गांधींना कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट प्रश्न विचारले, तर त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीही नसेल, असा दावाही त्यांनी केला. ‘भारत जोडो’ अभियानावरही टीका करत त्यांनी त्याला ‘भारत तोडो अभियान’ असे म्हटले.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विजयाचा उल्लेख करत जोशी यांनी गांधींच्या इंदूरमधील कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून ‘छात्रों की हुंकार’ दाखवून दिल्याचे म्हटले.
जोशी यांनी भारतीय तरुण देशभक्त असून विकसित भारताच्या संकल्पात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी १९ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका करत त्यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत प्रश्न विचारण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केला होता.
यापूर्वी त्यांनी कोटा, डेहरादून, प्रयागराज आणि पुणे येथेही तरुणांशी संवाद साधला आहे. जोशी सध्या मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प यात्रे’त सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशात आहेत.





