पुणे जिल्हा | राजकीय कुटुंबे रंगली मतदारांच्या गोतावळ्यात

मलठण, {तुकाराम कतुरे} – जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील विधानसभा मतदारसंघ असलेल्या दौंड विधानसभा निवडणुकीत कमालीची चुरस होणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर दौंडचे पारडे हे महायुतीकडे झुकले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत दौंडच्या सूज्ञ मतदारांनी तुतारीला साथ दिली.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या कुल, थोरात, पवार गटांकडून मतदारांची मने जिंकण्यासाठी मतपेरणी सुरू झाली आहे. राजकारण्याची कुटुंबे रंगले मतदारराजांच्या गोतावळ्यात, असे चित्र दिसून येत आहे.
दौंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभेतील पीछेहाटीचा फटका महायुतीला बसला होता. आमदार राहुल कुल यांचे प्राबल्य, माजी आमदार रमेश थोरात यांची ताकद असताना खासदार सुप्रिया सुळे यांना लीड मिळाले आहे. त्यामुळे महायुती सावध पाऊले टाकत आहेत.
भाजपच्या उमेदवार यादीत आमदार राहुल कुल यांचे नाव जाहीर केल्यानंतर कुल गटाला उत्साह आहे. आमदार कुल हे गावोगावी मतदारांशी संवाद साधत आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे रमेश थोरात यांनी निवडणूक लढवणारच, असा सूर आळवळला आहे.
थोरात हे गेल्या दोन महिन्यांपासून मतदार, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पूर्ण केल्या आहेत. थोरात हे अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यात फिरणारे आता नेते थेट जनतेच्या दरबारात नको, तर सुख – दुःखात सहभागी होऊ लागले आहेत, भावनिकतेला हात घालत इच्छुकांनी सुख-दु:खाच्या ठिकाणे भेटी देत मतपेरणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
भावनिकतेतून मतपेरणी
आपले जे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची आठवण उमेदवारांना झाली आहे. त्यांना संपर्क करून मध्यस्थीमार्फत चर्चेला बोलावून मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या दौंड तालुक्यात चालू आहे. नाराजी मागे मानपान, आर्थिक तसेच राजकीय कारणे आहेत.
त्यामुळे नाराजी काढण्यात नाकीनऊ येणार हे निश्चित आहे. मतदारसंघात मतदार म्हणतोय की, नवरात्रीत पैठणी पोहोचली आहे. आता लवकरच दिवाळीसाठी घरोघरी गोड फराळ पोहोचणारच आहे.
आतापर्यंत जे उमेदवार कधी भेटत नव्हते. ते मयत, दशक्रियेबरोबर आता लहान बाळाच्या वाढदिवसालाही हजेरी लावत हात मिळवण्याची संधी सोडत नाहीत. हा चर्चेचा विषय बनला आहे.
मतदारांना साद
दौंडमध्ये आमदार कुल यांचा दौरा सुरू झाला आहे. माजी आमदार थोरात यांनी गावागावांत भेटीगाठीवर भर दिला आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत आप्पासाहेब पवार यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार कुल आणि माजी आमदार थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हे मतदारांच्या संपर्कात जात आहेत. तिघांची गावपातळीपर्यंत संपर्क असल्याने ते मतदारांशी जोडून संवाद साधत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांनी कंबर कसली आहे.





