Pooja Khedkar | बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले होते. या अपहरण प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात पोहोचले. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांवर कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलीप खेडकर सध्या फरार आहेत. दरम्यान, मनोरमा खेडकर यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी चतुश्रुंगी पोलिसांची टीम पुण्यातील खेडकरांच्या बंगल्यावर दाखल झाली. पोलिसांनी बंगल्यातील कर्मचार्यांची सखोल चौकशी केली. मात्र, पोलिसांना मनोरमा खेडकर घरात आढळल्या नाहीत. त्या घरातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास खेडकर यांच्या बंगल्यावर थांबून संपूर्ण परिसराची झडती घेतली आहे. पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला आहे. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन गायब झाले आहेत. मात्र, त्यांचे मोबाईल मात्र सापडलेले नाहीत. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या रबाळे इथल्या अपघातातील 5000 क्रमांकाची लॅन्ड क्रुझर गाडी वगळता सर्व गाड्या बंगल्यातच आहेत. तर मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास, मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH12RP5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. यानंतर चालक चंदकुमार चव्हाण यांनी ट्रक मालक विलास ढेंगरे यांना तात्काळ माहिती दिली. यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. अपहरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी कारचा मागोवा घेऊन MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चालकाला घरातून बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला.