पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील पायगुडे इमारतीतील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक गणेश मोहीते, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार पेट्रोलिंगला असताना त्यांना कॅम्पस परिसरात अवैध हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पायगुडे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४ येथे छापा टाकण्यात आला. येथून सौरभ प्रकाश फडके (२७) व प्रितम अरुण कोयले (३२) हे दोघे युवक ग्राहकांना मानवी आरोग्यास अपायकारक हुक्का फ्लेवर्स पुरविताना आढळून आले. याचदरम्यान, प्रतिक जयंत गोळे (३४) हा ‘रूट २४’ हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी हुक्का ठेवून देत असल्याने त्यालाही अटक करण्यात आली. सदर तिन्ही आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५०८/२०२५ प्रमाणे भा.दं.वि. कलम १२३ तसेच COTPA महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ४-अ आणि २१-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक गणेश मोहीते, उपनिरीक्षक निलेश मोकाशी व इतर पोलिस अंमलदार यांनी केली.