Newasa News: नेवासा फाट्यावर तीन लॉजवर पोलिसांचा छापा; 11 महिला ताब्यात
Newasa News: या कारवाईदरम्यान महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Newasa News: अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार शेवगाव व नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकाने नेवासा फाटा परिसरातील तीन लॉजवर शनिवारी सायंकाळी धाड टाकून वेश्याव्यवसाय विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील तिरंगा, नामगंगा आणि मित्रप्रेम या लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर ढिकले आणि शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने सायंकाळी सुमारे सहा वाजता छापा टाकला.
या कारवाईदरम्यान महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या या दणकेबाज कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरातील अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.





