Rohit Pawar and Meghana Bordikar : स्टेजवरून पोलिसांना खुलेआम शिवीगाळ, मेघना बोर्डीकरांचं टाळ्यांनी प्रोत्साहन; रोहित पवारांकडून दुसरा व्हिडीओ ट्विट

परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. परभणीच्या पालकमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पोलिसांना खुलेआम शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ 5 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर करत महायुती सरकार आणि मेघना बोर्डीकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
याशिवाय, यापूर्वीच्या बोरी गावातील कार्यक्रमात बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला ‘कानाखाली मारण्याची’ धमकी दिल्याचा व्हिडीओही रोहित पवार यांनी पुन्हा शेअर केला आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
पोलिसांना धमकी, बोर्डीकरांचे टाळ्यांनी प्रोत्साहन
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका जुन्या व्हिडीओत परभणीतील एका कार्यक्रमात मेघना बोर्डीकर व्यासपीठावर उपस्थित असताना एक व्यक्ती पोलिसांना खुलेआम धमकी देताना दिसत आहे. या व्यक्तीने माईकवरून म्हटले, “माझ्या तिकडे गाड्या आहेत. कोणी माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, लक्षात ठेवा.
याबाबत काही अफवा असू दे, पण ही सगळी जबाबदारी पोलिसांची आहे.” विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या या आक्षेपार्ह वक्तव्यादरम्यान मेघना बोर्डीकर शांतपणे बाजूला उभ्या होत्या आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलट, त्या टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत, असे व्हिडीओत स्पष्ट दिसते.
रोहित पवार यांनी या व्हिडीओसह ट्विट करत लिहिले, “महायुतीच्या मंत्र्यांच्या मंचावरून पोलिसांना अशा प्रकारे धमकी आणि शिवीगाळ होत असेल, तर सामान्य माणसाला किती सुरक्षित वाटेल? मेघना बोर्डीकर यांनी या व्यक्तीला थांबवण्याऐवजी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले, हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे आहे.”
आदरणीय मेघनाताई,
आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि… pic.twitter.com/s0yyn1DNri— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2025
बोरी गावातील वादग्रस्त व्हिडीओ
रोहित पवार यांनी शेअर केलेला दुसरा व्हिडीओ परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील आहे. या कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला घरकुल योजनेचे लाभार्थी न आणल्याच्या रागातून धमकी दिल्याचा दावा आहे. व्हिडीओत बोर्डीकर ग्रामसेवकाला व्यासपीठासमोर बोलावून विचारतात, “तुला पगार कोण देतं?” ग्रामसेवकाने ‘शासन’ असे उत्तर दिल्यावर त्या संतापून म्हणाल्या, “मग ग्रामपंचायतीत सालगड्याचं काम कोणी सांगितलं? गावात 1500 घरकुल लाभार्थी आहेत, मग सगळे का आले नाहीत? तू काय कारभार करतो, ते मला माहिती नाही का? असं काम केलं तर कानाखाली मारेन. चमचेगिरी चालणार नाही. मी आज मुद्दाम सीईओ मॅडमना बोलावलं आहे. पुन्हा चमचेगिरी केलीस तर बडतर्फ करेन. हमाली करायची असेल तर नोकरी सोड.”
या व्हिडीओवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत लिहिले, “घरकुल योजनेचे लाभार्थी आणण्याचे टार्गेट पूर्ण न केल्याने ग्रामसेवकाला अशा धमक्या देणाऱ्या मंत्र्यांना कोणी अधिकार दिला? फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा आणि महाराष्ट्राची अब्रू धोक्यात आहे. कृपया यांना आवरा.”




