Ind Vs Pak : देशाच्या किनारपट्टीवर पोलिस अलर्ट मोडवर; प्रत्येक हालचालीवर नजर

मुंबई : दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे.
तर, दुसरीकडे भारतातील महत्त्वाच्या राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणपट्टीवर पोलिसांच्या हालचाली वाढल्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. मुंबईसह कोकणपट्टी आणि गोवा, बेळगाव जिल्ह्यात पोलिस अलर्ट मोडवर आहेत. सिंधुदुर्गातील सर्व चेक पोस्ट अलर्ट ठेवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीन मत्स्य विभागाचे पथक किनारपट्टीवरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर रायचूर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, कैगा अणुऊर्जा प्रकल्प आणि कृष्णराजसागर जलाशयासह अनेक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गोव्यात नौदल तळ असून आयएनएस मांडवी आणि आयएनएस हंसावरून अरबी समुद्रावर संपूर्ण नियंत्रण रहाणार आहे.
बांबोळी येथील २ सिग्नल ट्रेनिंग सेंटरमधून सर्व बिनतारी संदेश यंत्रणांवर करडी नजर ठेवली जात असल्याने गोवा या युद्धात संवेदनशील क्षेत्रात येत असल्यामुळे युद्धाबी परिसिमा वाढल्यास दाबोळी येथील विमानतळ नागरी उड्डाणासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, असे खास सूत्रांनी सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’ पाठोपाठ दुसऱ्या दिवशी लाहोरवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युध्दजन्य स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांनी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे.
तर संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकण किनारपट्टीवर खबरदारी म्हणून चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत.
कोकणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तिन्ही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून 24 तास गस्त सुरू करण्यात आली आहे.





