Team India Schedule : नेदरलँड्समध्ये घुमणार टीम इंडियाचा डंका! ‘या’ दिवशी येणार भारत-पाक आमनेसामने; पाहा वेळापत्रक
Team India Schedule : भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, भारत-पाकिस्तानमधील हाय-व्होल्टेज लढतीची तारीखही निश्चित झाली आहे.

Team India Schedule in Hockey World Cup 2026 : नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ‘हॉकी विश्वचषक २०२६’ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) प्रसिद्ध केलेल्या या वेळापत्रकानुसार, भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, भारत-पाकिस्तानमधील हाय-व्होल्टेज लढतीची तारीखही निश्चित झाली आहे.
हॉकी विश्वचषक २०२६ चे बिगुल वाजले असून १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान हा महाकुंभ रंगणार आहे. भारतीय पुरुष संघ आपल्या मोहिमेची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्धच्या सामन्याने करेल. विशेष म्हणजे, अॅमस्टेलवीन येथील वैगनर हॉकी स्टेडियमवर १९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.
भारतीय पुरुष संघाचे वेळापत्रक (पूल-डी) –
भारतीय पुरुष संघ ‘पूल-डी’ मध्ये असून त्यांचे सर्व साखळी सामने नेदरलँड्समध्ये खेळवले जातील. साखळी फेरीनंतर अव्वल दोन संघ पुढील फेरीत (पूल-F) प्रवेश करतील.
- १५ ऑगस्ट: भारत विरुद्ध वेल्स
- १७ ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड
- १९ ऑगस्ट: भारत विरुद्ध पाकिस्तान
भारतीय महिला संघाचे वेळापत्रक (पूल-डी) –
भारतीय महिला हॉकी संघ आपल्या मोहिमेची सुरुवात १६ ऑगस्ट रोजी चीनविरुद्धच्या सामन्याने करेल. महिलांचे उपांत्य सामने २७ ऑगस्टला, तर अंतिम सामना २९ ऑगस्ट रोजी अॅमस्टरडॅम येथे पार पडेल.
- १६ ऑगस्ट: भारत विरुद्ध चीन
- १८ ऑगस्ट: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- २० ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड
स्पर्धेचे स्वरूप कसं आहे?
हॉकी विश्वचषकात एकूण चार गट असून साखळी फेरीनंतर ‘अ’ आणि ‘क’ गटातील अव्वल दोन संघ ‘पूल-E’ मध्ये, तर ‘ब’ आणि ‘ड’ गटातील अव्वल दोन संघ ‘पूल-F’ मध्ये प्रवेश करतील. पुरुष गटाचे उपांत्य सामने २८ ऑगस्टला आणि अंतिम सामना ३० ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. भारतीय संघासमोर या स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांचे मोठे आव्हान असणार आहे.





