धक्कादायक! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे – स्वारगेट पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलिसाच्या पत्नीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती कैलास बर्डे (19) असे आत्महत्या केलेल्या पोलिस पत्नीचे नाव आहे. दरम्यान, ज्योती यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी, खडक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती बर्डे यांचे पती कैलास हे पुणे शहर पोलिस दलात नियुक्तीस आहेत. ज्योती या पतीसोबत स्वारगेट येथील कर्मचार्यासाठी असलेल्या शासकीय निवास्थानात राहत होत्या. शुक्रवारी (दि.6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्याघरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.
ज्योती यांनी जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्यांचा भाऊ घरी होता. त्याने ज्योती यांना खाली उतरवले. याबाबत खडक पोलिसांना माहिती देण्यात आली होती. उपचारासाठी ज्योती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळी खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भेट दिली. पोलिसांना ज्योती यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेली कोणतीही चिठ्ठी मिळून आलेली नाही.





