नवी दिल्ली – अटक केलेले तृणमूल काँग्रेस नेते मोनोब्रता जाना यांच्या पत्नीने एनआयए अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या बहाण्याने भूपतीनगर येथील आपल्या निवासस्थानी जबरदस्तीने घुसून आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.
एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी पश्चिम बंगालच्या पुर्व मेदिनपूर जिल्ह्यात २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात बलाई चरण मैती आणि मोनोब्रता जाना या दोन प्रमुख सूत्रधारांना अटक केली आहे.
जाना यांची पत्नी मोनी जाना हिने भूपतीनगर पोलीस ठाण्यात एनआयए अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत आरोप केला की एनआयए अधिकाऱ्यांनी छाप्यादरम्यान त्यांच्या निवासस्थानातील मालमत्तेची तोडफोड केली, काही उपस्थितांना मारहाण केली आणि आपल्या विनयभंगाचाही प्रयत्न केला. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
बॉंम्बस्फोट प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना अटक करण्यासाठी गेलेल्या एनआयएच्या पथकावर शनिवारी जमावाने कथित हल्ला केला. तथापि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्याच पथकाने गावकऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. भूपतीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात एनआयएचा एक अधिकारी जखमी झाला असून त्यांच्या वाहनाचे नुकसान झाल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.