पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! पुण्यात भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीसाठी आलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान ही घटना घडली. मैदानी चाचणीत धावताना एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
आज सकाळी 8 वाजता या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. भरती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून ससूनला नेलं. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला. शवविच्छेदनानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांन दिली.
भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या 800 ते 850 उमेदावारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले आहे. मैदानी चाचणीसाठी धावण्यासाठी 1600 मीटरचे अंतर देण्यात आले होते. तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला.
राज्यातील तिसरी घटना
पोलीस भरतीदरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भरतीत मुंबईत दोन युवक दगावलेत त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडला. तुषार भालके (वय 27) असं मयत युवकाचं नाव असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता.





