POCSO Case: चिंचवडच्या ‘त्या’ हैवानाला अखेर धडा! विशेष पोक्सो न्यायालयाने सुनावली १० वर्षांची सक्तमजुरी
POCSO Case: निगडी पोलिसांच्या महिला उपनिरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांच्या सखोल तपासाला यश; वैद्यकीय पुरावे अन् साक्षीदारांच्या आधारे आरोपी दोषी.

POCSO Case – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोहन चिनप्पा उर्फ केंचप्पा कुऱ्हाडे (वय ३३, रा. अजंठानगर, चिंचवड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष (पोक्सो) न्यायाधीश संध्या नायर यांनी हा निकाल दिला.
२०२० मध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांनी सखोल तपास केला. पीडितेचा जबाब, प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि घटनास्थळाचा पंचनामा यांसह भक्कम पुरावे संकलित केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. पी. एस. अग्रवाल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयीन कामकाजात निगडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंद मरभळ, पोलीस शिपाई अनिल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तसेच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे, निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक निरीक्षक राहुल गोंधे यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा केला.




