Pimpri Chinchwad: स्मार्ट सिटी की कचरा सिटी? पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचा विळखा; रोगराईमुळे नागरिक संतप्त
Pimpri Chinchwad: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मोकाट कुत्रे आणि डुकरांचा वावर वाढला; पावसाळ्यात मलेरिया-हिवतापाची साथ पसरण्याची भीती.

Pimpri Chinchwad – शहर स्मार्ट होत असल्याच्या घोषणा सुरू आहेत. पण प्रत्यक्ष चित्र वेगळे आहे. मोशी येथील दुर्घटनेनंतर शहरात जागोजागी रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या मैदानात कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. वाकड, चिखली, मोशी, निगडी, रावेत आणि भोसरी भागात ही समस्या तीव्र आहे. नवीन सोसायट्यांच्या आजूबाजूला कचरा साचतो आहे. नदीकाठालाही कचरा टाकला जातो.
पवना आणि इंद्रायणी नदीच्या परिसरात दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे मोकाट प्राण्यांचा वावर वाढला आहे. कुत्रे आणि डुकरे कचऱ्यांच्या ढीगावर जमा होतात. कचरा रस्त्यावर पसरतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. मलेरिया, हिवताप यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने कचरा उचलण्यात विलंब होतो. काही नागरिक रात्री कचरा टाकतात. हॉटेल आणि भाजी विक्रेत्यांकडूनही कचरा उघड्यावर टाकला जातो. त्यातच येत्या १५ ऑगस्टपासून मोठ्या सोसायट्यांकडून ओला कचरा न घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या सोसायट्यांकडून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्र सुरू आहे.
बिल्डरने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. असे असताना महापालिकेने त्या प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला कसा दिला, अशी विचारणा येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल मोठ्या सोसायटींमधील सदनिकाधारक करीत आहेत. कचरा ही फक्त महापालिकेचीच जबाबदारी नसून नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी, असे मत व्यक्त होत आहे.
कचरा योग्य ठिकाणी टाकणे गरजेचे आहे. स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. एकंदरीत, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्मार्ट सिटीची प्रतिमा टिकवायची असेल तर कचरा व्यवस्थापनात सुधारणा आवश्यक आहे. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दंडात्मक कारवाईवर प्रश्न
महापालिकेकडून दंडात्मक कारवाईची घोषणा झाली आहे. पण अंमलबजावणीची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त वागत आहेत. सीसीटीव्ही लावून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नियम तोडणाऱ्यांवर कठोर दंड व्हावा, अशी अपेक्षा आहे.






