POCSO Case : लग्नाचं आमिष अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी..वाचा सविस्तर
POCSO Case : लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणाला राहाता जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली २० वर्षांची सक्तमजुरी.

POCSO Case : शिर्डी परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला राहाता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ६ मार्च रोजी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शाहबाज रियाज अली सय्यद (वय २८, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२०२२ मध्ये शिर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शाहबाज सय्यद याने १४ वर्षीय पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पोक्सो कलमरनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
या खटल्याची सुनावणी राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात पार पडली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. पुराव्यांची साखळी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. बाबासाहेब पानगव्हाणे यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. व्ही. पी. खिस्ते यांनी बाजू मांडली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी सुभाष माळी आणि महिला पोलीस कर्मचारी पी. बी. बनकर यांनी सहकार्य केले.





