Red Fort Bomb Blast : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी डॉ. बिलाल नसीर मल्लाला 16 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत लाल किल्ल्याबाहेर झालेल्या भीषण स्फोट प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेताना या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी डॉ. बिलाल नसीर मल्ला यांना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) आठ दिवसांची कोठडी संपल्यानंतर शनिवारी कडेकोट सुरक्षेत मल्ला यांना न्यायालयात हजर करण्यात आले. एनआयएच्या तपासानुसार, मल्ला याने १५ जणांचा बळी घेणाऱ्या आत्मघाती स्फोटामागे सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी आय-20 कारमधील स्फोटक हल्लेखोर डॉ. उमर-उन-नबी यांना थेट लॉजिस्टिक मदत केल्याचा आरोप आहे.
याशिवाय, दहशतवादी हल्ल्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन डॉक्टर आणि एका मौलवीचा समावेश आहे. एनआयएचा तपास सुरू असून, पुढील दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





