Dehu Road Gangrape Case : त्या क्रूर कृत्यासाठी चौघा नराधमांना ‘मरेपर्यंत’ कोठडी; सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
Dehu Road Gangrape Case : २०२१ मधील सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा निकाल; नोमान खानसह चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा.

Dehu Road Gangrape Case – देहूरोड परिसरात २०२१ मध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चार नराधमांना पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पोलिसांनी सादर केलेले भक्कम तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान, सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन जोवद खान आणि सोहेल शेरअली पिरझादे या चौघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. या नराधमांविरुद्ध एका पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१ च्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून पीडित तरुणीवर लैगिंक अत्याचार केला होता.
आरोपींनी या कृत्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच काही आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केले होते. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सामुहिक अत्याचार, आयटी ॲक्ट सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयाने वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी तपासून आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक अमृत निंबाळे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील साक्षीदार आणि पुराव्यांचा पाठपुरावा करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.





