PMRDA News: पीएमआरडीएचा अजब कारभार! ४ महत्त्वाच्या योजना रामभरोसे; वाचा अधिकाऱ्यांचा ‘तो’ धक्कादायक प्रताप
PMRDA News: बांधकाम परवानगी विभागात ३३ अधिकाऱ्यांची फौज, पण टीपी स्कीम राबवायला कोणी मिळेना; 'मलईदार' खात्यांसाठी अधिकाऱ्यांची ओढाताण.

PMRDA News – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) चार टाउन प्लॅनिंग (टीपी) योजनांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली असली, तरी त्यांच्या अंमलबजावणीचा प्रश्न अद्यापही गंभीर बनला आहे. वडाचीवाडी, औताडे- हांडेवाडी, होळकरवाडी चार आणि होळकरवाडी पाच या टीपी योजनांवर सध्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याने या योजनांची गती मंदावली आहे.
या सर्व टीपी योजना प्रत्येकी सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून, रस्ते, सार्वजनिक सुविधा, आरक्षणे आणि नियोजनबद्ध विकासासाठी या योजना महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लवाद म्हणून पीएमआरडीएमधील सहायक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.
सेवानिवृत्त अधिकारी कोणत्याही वेळी राजीनामा देऊ शकतात किंवा कामातून बाजूला होऊ शकतात. त्यामुळे टीपी योजनांमधील सुनावण्या, जमिनींचे प्रश्न, हरकती आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही प्रकरणांमध्ये लवाद पदाचा कार्यभार सोडून दिल्यामुळे संबंधित योजनांच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या केवळ वडाचीवाडी व औताडे हांडेवाडी या टीपी योजनेसाठी एक लवाद कार्यरत असून, त्यांच्यावर तीन महिन्यांपासून जबाबदारी दिली आहे. उर्वरीत टीपी योजना राबविण्यासाठी लवादच नाहीत. त्यामुळे त्या मार्गी लागणार कशा, असा प्रश्न आहे. दरम्यान, पीएमआरडीए क्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
त्यामुळे या भागांतील टीपी योजनांची अंमलबजावणी पुणे महापालिकेकडे सोपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे जबाबदारी सोपवून सुटकेचा निःश्वास सोडण्याच्या तयारीत पीएमआरडीएचे अधिकारी आहेत. याबाबत आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
अधिकाऱ्यांना हवेत मलईदार विभाग
टीपी स्कीमची अंमलबजावणी करण्यासाठी सहायक संचालक पदावरील अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो. मात्र, त्याची जबाबदारी घेण्यास कोणीही इच्छुक नाही. केवळ बांधकाम व परवानगी विभागात हे अधिकारी मलईदार खाते घेऊन ठाण मांडून आहेत.
अधिकाऱ्यांची संख्या मोठी तरीही…
पीएमआरडीएच्या बांधकाम विभागात सध्या कार्यरत अधिकाऱ्यांची मोठी संख्या आहे. यामध्ये संचालक पदावर एक, महानगर नियोजनकार दोन आहेत. सहायक संचालक चार, नगररचनाकार सहा आणि सहायक नगररचनाकारांची संख्या २० अशी मिळून ३३ अधिकारी बांधकाम परवानगी व नियोजन विभागात असूनही टीपी स्कीम खोळंबलेल्या अवस्थेत आहेत.






