PMRDA Structure Plan: ‘त्या’ चुकीनंतर पीएमआरडीए सुधारली! पुण्याच्या ६०० गावांचा चेहरा बदलणार; मास्टर प्लॅन तयार
PMRDA Structure Plan: पुढील २५ वर्षांचे आव्हानात्मक नियोजन! वाहतूक कोंडी, पर्यावरण ऱ्हास आणि पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी उच्चशिक्षित तज्ज्ञांची फौज मैदानात.

PMRDA Structure Plan – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मागील प्रारुप विकास आराखड्यात (डीपी) झालेल्या मोठ्या गोंधळामुळे प्राधिकरणाला तो डीपी रद्द करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, मागील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि पीएमआरडीए हद्दीतील ६०० गावांचा पुढील २० ते २५ वर्षांचा सुनियोजित विकास करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
प्राधिकरणाने आता स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले असून, यामध्ये वाहतूक कोंडी, निसर्गाचा ऱ्हास आणि वाढत्या नागरीकरणाच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उच्चशिक्षित तज्ज्ञांचा सहभाग निश्चित केला आहे. स्ट्रक्चर प्लॅन तयार करताना भविष्यातील पुणे महानगरांसमोरील आव्हाने नजरेसमोर ठेऊन विभागनिहाय उद्दीष्टे निश्चित केली आहेत. ती खालील प्रमाणे
वाहतुकीचे नियोजन
नव्याने विकसित होणारे भाग ओळखून, तेथे भविष्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या गरजेनुसार दळणवळणाचे जाळे सुचवणे. मुख्य महामार्गांव्यतिरिक्त इतर आवश्यक रस्त्यांची पायाभूत रचना निश्चित करणे आणि भविष्यातील मागणीनुसार रस्त्यांचे योग्य पदानुक्रम ठरविले जातील. पुणेकरांसाठी भविष्यात लागणारे सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि आवश्यक सुविधांबद्दल ठोस उपाययोजना सुचवणे. वाहतूक प्रकल्पांना प्राधान्यक्रम देणे, त्यांच्यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन करणे आणि प्रकल्पांच्या देखरेखीसाठी यंत्रणा उभारणे आदीकडे पीएमआरडीए लक्ष देणार आहे.
पर्यावरण नियोजन
डोंगर माथा आणि डोंगर उतार क्षेत्रांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण व संरक्षण करणे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करून घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी योग्य जागा निश्चित करणे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष वॉटर रिचार्ज योजना व धोरणात्मक उपाय सुचवणे. नदी, नाले , तलाव, जंगले आणि संवेदनशील पर्यावरण क्षेत्रांचे नकाशे तपासून ते अचूक करणे. मोठ्या उद्यानांसाठी जागा सुचवणे.
जीआयएस तज्ज्ञांची भूमिका
पीएमआरडीएच्या रचनेला अनुकूल अशी संपूर्ण जीआयएस डेटा मॉडेल तयार करणे. सर्व प्रकारच्या भौगोलिक आणि सांख्यिकीय माहितीसाठी एक मुख्य डेटा बेस करणे. वाहतूक, भूवापर आणि पर्यावरणविषयक माहितीचे एकत्रीकरण करून नेटवर्क, सुलभता आणि योग्यतेचे प्रगत विश्लेषण करणे, पुण्याच्या बेस मॅपसाठी आणि शहरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग व उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रांचे निरीक्षण आणि विश्लेषण करणे.
विश्लेषकांची भूमिका
विविध सरकारी विभाग आणि सर्वेक्षणांमधून मिळालेला भौगोलिक व इतर डेटा गोळा करून तो प्रमाणित करणे. उपग्रहाद्वारे मिळालेली चित्रे आणि कॅड ड्रॉइंग्जच्या मदतीने वाहतूक, भूवापर आणि पर्यावरणविषयक वैशिष्ट्यांचे अचूक डिजिटल नकाशे व लेअर्स तयार करणे. जीआयएस डेटाबेसमधील त्रुटी शोधणे, अपूर्ण माहिती भरणे आणि डेटा नेहमी अपडेट ठेवणे .प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन घेतलेला जीपीएस डेटा तपासणे आणि त्यानुसार मुख्य संगणकीय नकाशामध्ये आवश्यक ते बदल करणे.






