PMRDA Lottery : पीएमआरडीएच्या घरांची सोडत जाहीर! १०२९ कुटुंबांना मिळालं हक्काचं घर..वाचा सविस्तर
PMRDA Lottery : अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग प्रवर्गासह सर्वसाधारण गटातील १०२९ लाभार्थ्यांची घोषणा; हक्काच्या घरामुळे लाभार्थ्यांनी व्यक्त केला आनंद.

PMRDA Lottery – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एकूण १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८) पार पडली. मानवरहित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेतून स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थित अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता आणि सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ही बहुप्रतिक्षित सोडत काढण्यात आली. यावेळी यशस्वी लाभार्थ्यांना महानगर आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या सोडतीमध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट अशा दोन्ही गटांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
पेठ क्र. १२ मधील ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ५२, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती ८, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती २ आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील ३ सदनिकांसाठी विजेते निश्चित झाले. याच पेठेत अल्प उत्पन्न गटामध्ये सर्वसाधारण २१७, अनुसूचित जाती ३३, अनुसूचित जमाती २०, विमुक्त जाती १०, भटक्या जमाती २ आणि अपंग प्रवर्गातील १६ लाभार्थ्यांना घरे मिळाली.
दुसरीकडे, पेठ क्र. ३०-३२ च्या ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण २३७, अनुसूचित जाती ३७, अनुसूचित जमाती ७, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती ५ आणि अपंग प्रवर्गातील ५ लाभार्थ्यांची निवड झाली. तर याच पेठेत एलआयजी गटामध्ये सर्वसाधारण १५१, अनुसूचित जाती २९, अनुसूचित जमाती ३, विमुक्त जाती ४ आणि अपंग प्रवर्गातील ११ लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. या यशस्वी लाभार्थ्यांची आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या लाभार्थ्यांना एसएमएस देखील पाठवण्यात आले आहेत.





