PMRDA housing lottery : प्रतीक्षा यादीतील नागरिकांना मोठी संधी! पीएमआरडीएच्या ४७२ सदनिका लाभार्थ्यांनी नाकारल्या
PMRDA housing lottery : ८७१ सदनिकांपैकी केवळ ३९९ लाभार्थ्यांनी स्वीकारली घरे; ७३ जणांनी प्रतिसाद न दिल्यामुळे नोंदणी रद्द होणार.

PMRDA housing lottery – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सदनिकांच्या सोडतीत पात्र झालेल्या ४७२ लाभार्थ्यांनी पुढील प्रक्रिया करण्यास नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिल्लक सदनिकांसाठी आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठी संधी निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया करावी लागणार असून, प्रशासन लवकरच त्याबाबत सूचना करणार आहे.
पीएमआरडीएच्या आकडेवारीनुसार एकूण ८७१ सदनिकांपैकी ३९९ लाभार्थ्यांनी आपली सदनिका स्वीकारली आहे. मात्र, तेवढ्याच म्हणजे ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत. याशिवाय ७३ लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. अशा लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया रद्द होणार आहे. परिणामी जवळपास निम्म्याहून अधिक सदनिका पुन्हा वितरणासाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादीतील नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात असून, सोडतीत नाव न लागलेल्या अर्जदारांना या रिक्त सदनिकांसाठी संधी दिली जाणार आहे. पीएमआरडीएकडून लवकरच यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू होणार असून, संबंधित लाभार्थ्यांना सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अर्जदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सदनिका नाकारण्यामागे विविध कारणे समोर येत आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे रक्कम भरणे शक्य झाले नाही, तर काहींना सदनिकेचे ठिकाण किंवा सुविधा पसंत पडल्या नाहीत. काही अर्जदारांनी वेळेत कागदपत्रे पूर्ण न केल्यामुळे किंवा प्रशासनाशी संपर्क साधला नसल्याने त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. यामुळे पीएमआरडीएला पुन्हा प्रक्रिया राबवावी लागत आहे.
“लाॅटरी पद्धतीत काहींना सदनिका प्राप्त झाल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्या नाकारल्यानंतर शिल्लक सदनिकांसाठी प्रतीक्षा यादीतील नागरिकांना संधी देण्यात येणार आहे. त्यांनी सदनिका स्वीकारल्यानंतर सदनिकांची रक्कम भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देणार आहे.”
– पूनम मेहता, सहआयुक्त, पीएमआरडीए





