PMPML Bus Theft : पीएमपी बस पळवणारा तरुण निघाला मनोरुग्ण! बस चोरणाऱ्या गोपालसिंगबाबत धक्कादायक खुलासा
PMPML Bus Theft : नोकरीच्या शोधात मुंबईत आला, पण पुण्यात बस पळवत थेट पोलिसांच्या तावडीत सापडला; आरोपीची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती.

PMPML Bus Theft : महापालिका भवन परिसरातून शनिवारी पीएमपी बस पळवून नेल्याच्या घटनेतील आरोपी मनोरुग्ण असल्याचे उघड झाले आहे. तो मुळचा उत्तराखंडचा असून मुंबईत चालकाची नोकरी शोधण्यासाठी आला होता. तेथून तो पुण्यात कसा आला हे तो सांगू शकत नाही. त्याला फक्त कार, जीप सारखी लाईट व्हेईकल वाहने चालवता येतात. गोपालसिंग बिलबलसिंग राणा (२०, रा. उत्तराखंड )असे त्याचे नाव आहे.
पीएमपीच्या स्टेअरिंगजवळची चावी चालक विसरुन गेला होता. तेथून जाणाऱ्या गोपालसिंगने बस सुरू केली आणि महापालिका भवन, जंगली महाराज रस्त्यावरुन बस गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यापर्यंत नेली. गोखले स्मारक चौकात एक कार्यक्रम सुरू होता. पीएमपी बस पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर चौकात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून बस अडविली. गोपालसिंगला ताब्यात घेतले.
चौकशीत राणा असंबध्द उत्तरे देत आहे. यामुळे त्याच्या परिवाराबद्दल जास्त माहिती पोलिसांना मिळू शकली नाही स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातून २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने एसटी बस पळवून नेली होती. भरधाव एसटीने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. शंकरशेठ रस्ता, स्वारगेट परिसरात त्याने पादचारी, तसेच वाहनांना धडक दिली होती. या घटनेत नऊजणांचा मृत्यू झाला होता, तसेच २७ जण जखमी झाले होते. गोपालसिंगच्या शनिवारच्या घटनेने संतोष माने घटनेची आठवण करून दिली.





