नागपूरातील मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला; एकाचा दुर्दैवी मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी

नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. रुग्ण जेवणाला बसलेले असतानाच हा प्रकार घडल्याने सर्वत्र धावपळ उडाली.रुग्णालयाच्या हिरवाईने वेढलेल्या ४० एकर जागेत एका उंच झाडावर मोठे पोळे असल्याचे सांगितले जाते.
या घटनेत ६० वर्षीय किसन नावाच्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३९ रुग्ण तसेच दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमणे यांनी दिली. मधमाश्यांच्या दंशामुळे अचानक गोंधळ झाल्याने काही रुग्णांची घाबरून धक्कादायक अवस्था झाली होती.
जखमींना तातडीने रुग्णालयातील वेगळ्या विभागात हलवून उपचार करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने त्वरित परिसरातील सर्व कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व सुरक्षारक्षकांना सतर्क केले. रुग्णालयाचा मोठा परिसर असल्याने आणि झाडांची दाटी असल्याने वन विभागाकडून आता या भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.





