PMPML Bus Fire – निघोजे-म्हाळुंगे मार्गावरून प्रवास करणार्या पीएमपीएमएल बसला आज सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समोर बस (एमएच 12 एसएफ 1388) ही आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने, बसमधील सुमारे 45 ते 50 प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.आज सकाळी ठीक 8:45 वाजता ही पीएमपीएमएल बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. धुराचे लोट पाहताच चालकाने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.घटनेची माहिती मिळताच सरपंच सुनिता कैलास येळवंडे, किरण चिचोरे आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढाकार घेतला.सरपंच व स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. निघोजे फायर ब्रिगेड आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस कर्मचारी, महिंद्राची टीम आणि स्थानिक तरुणांनी एकत्र येत आग विझवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या भीषण आगीत बसचे पूर्ण आर्थिक नुकसान झाले असून गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. मात्र, सरपंच, प्रशासन आणि सतर्क नागरिकांच्या तत्परतेमुळे 50 प्रवाशांपैकी कोणालाही इजा झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.