PMC Water Tanker: पुणेकरांना मोठा दिलासा! उंड्री आणि बावधनमध्ये सुरू होणार नवीन टँकर पॉईंट
PMC Water Tanker: सध्या शहरातील ९ टँकर पॉईंट्सवर ताण; नव्या सुविधेमुळे वाहतुकीचा वेळ वाचणार आणि पाणीपुरवठा जलद होणार.

PMC Water Tanker – महापालिकेकडून शहरात देण्यात येणाऱ्या टॅंकरच्या पाण्याची मागणी दिवसाला सरासरी २०० ने वाढली आहे. यानुसार पालिकेकडून शहरात दोन नवीन टॅंकर पाॅईंट उभारण्यात येत आहेत. उंड्री भागासाठी दोराबजी माॅल येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात तसेच बावधन येथील जागेत हे टॅंकर पाईंट उभारले जाणार आहेत. पाणीकपातीनंतर महापालिकेकडे आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नवनीत कौर यांनी शनिवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यानुसार दोन टॅंकर पाॅईंट सुरू करण्यासह नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागास देण्यात आल्या. सध्या, शहरात पर्वती, पद्मावती, रामटेकडी, एरंडवणे, वडगावशेरी, पाषाण, येरवडा, चतु:शृंगी, धायरी हे टॅंकर पाॅईंट सुरू आहेत. यातील हडपसर आणि परिसरात रामटेकडी तसेच पर्वती केंद्रातून पाणी दिले जात होते. त्यामुळे टॅंकरला १० ते २० कि.मी.चा फेरा पडत होता. बावधन आणि वारजे परिसरासाठी पाषाण आणि चतु:शृंगी टॅंकर भरणा केंद्रातून पाणी दिले जात होते. मात्र, बावधनलाच स्वतंत्र पाॅईंट झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टेल एन्ड परिसरात अडचणी…
शहरात दिवसाआड पाणीकपातीमुळे जलवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्यास अडचणी येत आहेत. तसेच, या भागात कमी दाबाने पाणी कमी येत आहे. त्यामुळे अशा भागातून पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणे तसेच १० ते १५ मिनिटे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्यामुळे अशा भागात जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी नियोजनाच्या वेळेत बदल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.




