PMC Security: महापालिकेत सुरक्षेचा खेळखंडोबा! २०० हून अधिक कर्मचारी ओळखपत्राशिवाय; बॉम्बच्या धमकीनंतर तपास
PMC Security: केवळ गेट-पासवर मिळाली गुरुवारी सवलत; वैध ओळखपत्राशिवाय उद्यापासून पालिकेचे दरवाजे बंद, मेटल डिटेक्टरद्वारे होणार कडक तपासणी.

PMC Security – महापालिकेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलनंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले. , मात्र, यात महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या वर्तणुकीचाच बाॅम्ब फुटल्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेतील तब्बल २०० हून अधिक कर्मचारी ओळखपत्राशिवाय केवळ गळ्यात दोरी (लॅनयार्ड) अडकवून महापालिकेत प्रवेश करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना समज देऊन शुक्रवारपासून ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.
बाॅम्बच्या इमेलमुळे महापालिका सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. पहिल्याच दिवशी आयुक्तांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांचीही कडक तपासणी करण्यात आली. प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले. या वेळी महापालिकेतील अनेक कर्मचारी केवळ महापालिकेच्या नावाची दोरी गळ्यात घालून आल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात त्यांच्या गळ्यात ओळखपत्र नव्हते. प्रवेश मिळवण्यासाठीच फक्त लॅनयार्ड वापरल्याची कबुली काही कर्मचाऱ्यांनी दिली.
सुरक्षा यंत्रणेने अशा कर्मचाऱ्यांची नोंद घेत त्यांना तंबी दिली. गुरुवारी गेट-पासच्या आधारे प्रवेश दिला असला, तरी शुक्रवारपासून वैध ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारपासून आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्वतःची बॅग तपासणीसाठी देत नियमांचे पालन केले. त्यांच्या पाठोपाठ विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ओळखपत्र दाखवून आणि बॅग तपासून घेतल्यानंतरच महापालिकेत प्रवेश केला.
“महापालिकेच्या सुरक्षेबाबत महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, गुरुवारपासून प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि बॅग तपासणीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. ओळखपत्र नसतानाही महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांनी केला. ज्या ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना ओळखपत्र देण्याविषयी सांगण्यात आले आहे.”
– राकेश विटकर, प्रमुख, सुरक्षा विभाग, महापालिका.





