PMC News – महापालिकेच्या २०२१ मध्ये झालेल्या हद्दवाढीत नांदेड सिटीचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. त्यानंतर या भागातील मिळकतींची नोंदणी महापालिकेकडे करताना २०२१ पूर्वी मिळकतीचे जेवढ्या वेळा हस्तांतरण झाले आहे. त्या प्रत्येक हस्तांतरणाचे शुल्क आकारले जात होते. या पुढे केवळ २०२१ नंतरचेच हस्तांतरण शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी दिली. महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने नांदेड सिटीत शनिवारी ‘प्रशासन आपल्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नांदेड सिटीतील नागरिकांच्या मिळकतकर विषयक असलेल्या समस्यांचे निराकारण तसेच प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली. नगरसेवक काका चव्हाण, सुभाष नाणेकर, अनिता इंगळे, धनश्री कोल्हे, सहायक आयुक्त दीपक राऊत, इंद्रायणीकरचे तसेच कर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय पंकज देडगे, ॲड. नरसिंह लगड, दत्तात्रय देडगे, माजी सरपंच नांदेड गाव, धुमाळ तसेच नांदेड सिटी सोसायटीचे पदाधिकारी आणि सोसायटीतील सुमारे १७५ सभासद उपस्थित होते. यावेळी उपायुक्त रवि पवार यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करीत त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली. त्यात, महापालिकेने केलेली कर आकारणी, कर नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. या सर्व तक्रारींचे लवकरच निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, कर रचनेच्या धोरणात्मक बाबींवर महापालिका आयुक्त आणि मुख्य सभेसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या कर विषयक समस्या सोडविणे व जनजागृती करण्यासाठी शहरातील इतर भागातही ‘प्रशासन आपल्या दारी’ अभियान राबविण्याचा कर आकारणी व कर संकलन विभागाचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरी सुविधा केंद्रात कर्मचारी वाढविणार नांदेड सिटी परिसरात असलेल्या महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात केवळ एकच कर्मचारी असून, त्यांच्याकडून मिळकतधारकांशी वाद घातले जात असल्याची तक्रार यावेळी या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली. त्यावेळी या कार्यालयातील कर्मचारी बदलले जाणार असून, दोन ते तीन नवीन कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.