पुरंदर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वेताळवाडी गावात पाणीटंचाई आणि पाण्याच्या गुणवत्तेच्या दीर्घकालीन समस्यांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण सामुदायिक सेवा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक पाण्याच्या विहिरीचे खोलीकरण तसेच संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, त्यामुळे ग्रामस्थांना स्वच्छ व विश्वसनीय पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्र येत प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. या सहकार्यामुळे प्रकल्पाची यशस्वी पूर्तता तर झालीच, शिवाय गावकऱ्यांमध्ये सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ झाली. सुधारित पाणी उपलब्धतेमुळे घरगुती वापरासह शेती व पशुधनासाठीही स्वच्छ पाणी मिळणार आहे. या उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमास रोटेरियन संतोष सुरपुरे, अतुल कारले, प्रा. अमरसिंह कणसे पाटील, प्रदीप कुलकर्णी यांच्यासह रोटरी क्लबचे इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी इंटरनॅशनलच्या शाश्वत पाणी व स्वच्छता उपाययोजनांच्या ध्येयाशी सुसंगत असा हा प्रकल्प असून, वंचित ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीच्या वचनबद्धतेचे हे उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.