PMC News: निविदाच न काढल्याने शहरात ‘हा’ मोठा धोका; १.५ कोटी रुपये देऊनही महापालिका ढिम्म
PMC News: वृक्षसंवर्धनाचा दीड कोटींचा निधी धूळ खात; क्षेत्रीय कार्यालयांनी निविदा न काढल्याने ऐन पावसाळ्यात झाडांची छाटणी रखडली.

PMC News – प्रत्येकी १० लाख याप्रमाणे वृक्षसंवर्धनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी मिळून दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, त्याच्या निविदाच काढण्यात न आल्याने वृक्ष छाटणीचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. झाडांच्या अनियंत्रित वाढलेल्या फांद्यांमुळे विजेच्या तारांना धक्का लागत असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यातच ही तरतूद करण्यात आली होती.
त्यानुसार २४ मार्च रोजी ही रक्कम प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली; परंतु त्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष छाटणी, धोकादायक फांद्या काढणे, धोकादायक वृक्ष काढणे या सगळ्या गोष्टींसाठीच्या निविदा काढून पावसाळ्याच्या आत ही सर्व कामे होणे अपेक्षित होते. मात्र, यातील एकही गोष्ट झाली नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच बाजीराव रस्त्यावरील अभिनव चौकात मोठे झाड उन्मळून पडले. एका विद्यार्थिनीच्या अंगावर हे झाड पडले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याशिवाय मंगलमूर्ती चौकातही ऐन पालख्या येण्याच्या काही दिवस आधीच पहाटेच्या सुमारास झाड पडले. हे झाड पालखीसाठी टाकलेल्या मंडपावर पडले. तेथेही सुदैवाने कोणीच नव्हते, हीच घटना पालखी मुक्कामाच्या काळात घडली असती, तर याची कल्पनाच करवत नाही. याशिवाय नवश्या मारुती मंदिराजवळही झाड पडून एक वृद्ध महिला दगावल्याची घटनाही घडली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसानेही झाडे, फांद्या पडण्याच्या अनेक घटना घडत आहेत, तसेच वाढलेल्या फांद्या विजेच्या तारांना घासल्याने तारा तुटून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार शहरात घडले आहेत.
“क्षेत्रीय कार्यालयांना लाॅकिंग दिले आहे. त्यांनी त्यांच्या स्तरावर या निविदा काढणे आवश्यक आहे. काही जणांनी त्या काढल्या आहेत. ज्यांच्या राहिल्या आहेत, त्यांना लवकर कार्यवाही करण्यासंदर्भातील आदेश पत्राद्वारे अतिरिक्त आयुक्त ओपप्रकाश दिवटे यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.”
– डाॅ. अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, पुणे महापालिका






