Gunjawani River: २५ गावांचा संपर्क तुटणार! गुंजवणी नदीवरील ‘तो’ रस्ता वाहून गेला; जनजीवन विस्कळीत
Gunjawani River: डिसेंबर २०२५ मधील संकट सहा महिन्यांनंतरही कायम; मुख्य पूल कोसळल्याने ऐन पावसाळ्यात दळणवळणाची समस्या गंभीर.

Gunjawani River – डिसेंबर २०२५ मध्ये गुंजवणी नदीवरील मुख्य पूल कोसळल्याने निर्माण झालेले संकट सहा महिने उलटूनही अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यातून नदीपात्रात सिमेंट पाइप टाकून तयार केलेला तात्पुरता रस्ता नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे सुरवड-कोदवडी परिसरातील २५ गावांचा संपर्क पुन्हा एकदा तुटण्याच्या मार्गावर आहे.
ऐन पावसाळ्यात दळणवळणाची ही समस्या गंभीर बनल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत. नदीवरील मुख्य पूल कोसळल्यानंतर प्रवासासाठी ‘आंबवणे ते सोंडे’ हा पर्यायी मार्ग सुचवला होता. मात्र, या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा मार्ग जीवघेणा ठरत असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर जसा वाढेल, तशी या मार्गाची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.
दळणवळणाच्या समस्येचा सर्वाधिक फटका रुग्ण, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला बसत आहे. तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात जायचे झाल्यास रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर शेतमालाची वाहतूक करणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याकडे केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना केली होती, परंतु ती पावसाचा मारा सहन करण्याइतकी सक्षम नव्हती, हे आता सिद्ध झाले आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, मुख्य पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे हीच आता एकमेव निकड आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास हा परिसर मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की नागरिकांना पुन्हा निसर्गाच्या आणि दळणवळणाच्या चक्रव्यूहात लोटणार, असा संतापाचा सूर उमटत आहे.




