PMC News – पावसाळा दोन महिन्यांवर आला, तरी निविदांना उशीर झाल्याने महापालिकेने शहरात पावसाळी नाले, चेंबर, तसेच पावसाळी वाहिन्यांची सफाई सुरू केलेली नव्हती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने संपूर्ण शहरातच पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पुणेकरांच्या टीकेचा सामना करावा लागलेल्या महापालिका प्रशासनाने अखेर शहरात नाले सफाईची कामे सुरू केली आहे. महापालिकेकडून या कामांसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ निविदा काढल्या असल्या, तरी या निविदा अद्याप स्थायी समितीत मान्यतेसाठी न ठेवताच कामांना उशीर झाल्याचे कारण देत थेट कमी दराच्या निविदा आलेल्या ठेकेदारांना कामे दिली आहेत. त्यामुळे त्यावरूनही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. निविदा दरांवरून वादाची शक्यता स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर समितीच्या बैठकांमध्ये नाले सफाई, पदपथ, चेंबर समपातळीत करणे अशा कामांच्या निविदा ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्याने स्थायी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या कमी दराच्या निविदा आल्याने कामे निकृष्ट होतात, तसेच कामे न करताच बिले काढल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे स्थायी समिती १० टक्क्यांपेक्षा कमी दराच्या निविदा आल्यास मान्यताच देणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, यापूर्वी गेली चार ते पाच वर्षे नाले सफाईच्या निविदा सतत ५५ टक्के कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे आता मंजुरीआधीच कामास सुरुवात झाल्याने निविदा कमी दराच्या आल्यास वाद होण्याची शक्यता आहे.