PMC News : स्थायी समितीचा ‘यू-टर्न’! महिनाभर पुढे ढकललेला ३ कोटींचा ‘तो’ प्रस्ताव अचानक मंजूर
PMC News : २३ गावांमधील ६५ शाळांमध्ये आता संगणक कक्ष आणि ई-लर्निंगची सुविधा; पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी काम पूर्ण करण्याचे स्थायी समितीचे आदेश.

PMC News – महापालिकेच्या अंदाजपत्रकात २०२६-२७ मध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या ७५ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांच्या नावाखाली मागील वर्षाच्या अंदाजपत्रकातून तब्बल ३ कोटी १४ लाख ६८ हजार ८०० रुपयांपर्यंत (सर्व करांसह) खेळणी तसेच शालेय साहित्य खरेदीस स्थायी समितीने अखेर मान्यता दिली आहे.
शाळांना पुढील दोन महिने असलेली उन्हाळी सुटी आणि अद्याप शाळा निश्चित नसल्याने प्रशासनाने स्थायी समितीत ठेवलेला हा प्रस्ताव ९ एप्रिल रोजी महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, अचानक साहित्य खरेदीची गरज भासलेल्या प्रशासन आणि समितीने आपलाच निर्णय मागे घेत आयुक्तांच्या जुन्या प्रस्तावाप्रमाणे खरेदीस मान्यता दिली आहे. त्यामुळे, या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रस्तावानुसार शाळांमधील बालवाडी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक खेळणी दिली जाणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
समाविष्ट गावांच्या ६५ शाळांत ई- लर्निंग
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ६५ शाळांमध्ये संगणक कक्ष उभारून ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीने दिला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होण्यापूर्वी या योजनेला अंतिम मान्यता देण्याची शिफारस स्थायी समितीमार्फत मुख्य सभेकडे करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून सध्या महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये संगणक कक्ष उभारून ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर नव्याने समाविष्ट गावांमधील शाळांनाही या सुविधांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.





