PMC News : पुणेकरांचा जोरदार प्रतिसाद! १० दिवसांत ७२ कोटींचा कर जमा; महापालिकेची तिजोरी भरली
PMC News : महापालिकेकडून २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी बिलांचे वाटप सुरू; पहिल्या १० दिवसांतच ७२ कोटींचा मिळकतकर पालिकेकडे जमा.

PMC News – महापालिकेकडून शहरातील मिळकतकरधारकांना यंदा पोस्टाच्या माध्यमातून बिले पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत १४ लाख ९९ हजार बिलांपैकी तब्बल आठ लाख ८२ हजार बिलांचे वाटप पूर्ण झाले आहे, तर या दहा दिवसांत सुमारे ७२ कोटींचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिकेकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १४ लाख ९९ हजार मिळकतधारकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात येणार आहेत.
प्रशासनाकडून ही बिले १ एप्रिलपासूनच नागरिकांना पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात देण्यात आली आहेत. याशिवाय ज्या मिळकतधारकांचे मोबाइल क्रमांक महापालिकेकडे नोंद आहेत, त्यांना मेसेजद्वारे बिलाची लिंक पाठविल्याने नागरिकांनी बिले भरण्यास सुरुवातही केली आहे. महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे ३१ मे पूर्वी मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत देण्यात येणार असून,
जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना वेळेत कर भरता यावा, या उद्देशाने महापालिकेची शहरातील कर भरणा केंद्रे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत सुरू ठेवली जाणार आहेत. नागरिकांनी करभरणा केंद्रासह ऑनलाइन माध्यमातूनही कर भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे.



