PMC News: महापालिकेला अखेर जाग! डेंग्यू रोखण्यासाठी तैनात करणार २६५ कंत्राटी कर्मचारी
PMC News: शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; महापालिकेकडून तातडीने २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश.

PMC News – शहरात डास नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे असल्याने आता अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डेग्यू, चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक असलेल्या भागांमध्ये हे कर्मचारी प्राधान्याने नेमण्याचवे निर्देश स्थायी समितीत आरोग्य विभागास देण्यात आले आहेत. शहरात यावर्षी आतापर्यंत संशयीत डेंग्यूचे १८२ रुग्णांपैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चिकुनगुनियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. विशेषतः ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याची बाब प्रभात ने दोन दिवसांपूर्वीच समोर आणली होती, त्याची दखल घेत स्थायी समितीने तातडीने उपाय योजनाचे आदेश दिले आहेत. महापालिकेने डास नियंत्रणासाठी १५० कायमस्वरूपी पदे भरली आहेत. मात्र, उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने २६५ कंत्राटी कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव आहे.
परंतु, पावसाळा संपत आला तरी हे कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष कामावर उपलब्ध झालेले नाहीत. डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढल्यानंतरच मनुष्यबळाची प्रक्रिया सुरू होत असल्याने याला जबाबदार कोण, असा सवाल करीत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना वेग देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉटस्पॉटवर विशेष मोहीम…
डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे हॉटस्पॉट निश्चित करून तेथे डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करावीत. सर्वेक्षण, फवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. अतिरिक्त २६५ कर्मचाऱ्यांचा वापर प्रामुख्याने रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांसाठी करावा आणि या संपूर्ण मोहिमेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश श्रीनाथ भिमाले यांनी बैठकीत दिले आहेत.





